Connect with us

Shri Guru Charitra

Shri Guru Charitra Adhyay 10 – श्री गुरुचरित्र अध्याय दस

Shri Guru Charitra Adhyay

श्री गुरु चरित्र परयाण का यह दसवां अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण ।
कुरवपुरींचे महिमान । केवी जाहले म्हणतसे ॥ १ ॥

म्हणसी श्रीपाद नाही गेले । आणिक सांगसी अवतार झाले ।
विस्तार करोनियां सगळे । निरोपावे म्हणतसे ॥ २ ॥

सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी ।
अंनतरुपें होतीं परियेसीं । विश्र्वव्यापक परमात्मा ॥ ३ ॥

पुढें कार्याकारणासी । अवतार झाला परियेसीं ।
राहिला आपण गुप्तवेषीं । तया कुरवक्षेत्रांत ॥ ४ ॥

पाहें पा भार्गवराम देखा । अद्यापि स्थिर-जीविका ।
अवतार जाहला आपण अनेका । तयाचेनिपरी निश्र्चयावें ॥ ५ ॥

सर्वां ठायीं वसे आपण । मूर्ति एक नारायण ।
त्रिमूर्तीचे तीन गुण । उत्पत्ति-स्थिति-लयासी ॥ ६ ॥

भक्तजन तारावयासी । अवतार होती ह्रषीकेशी ।
शाप दिधला दुर्वासऋषीं । कारण असे तयाचे ॥ ७ ॥

त्रयमूर्तीचा अवतार । त्याचा कवणा कळे पार ।
निधान तीर्थ कुरवपुर । वास तेथे गुरुमूर्ति ॥ ८ ॥

जें जें चिंतिले भक्तजनीं । लाधती श्रीगुरुदर्शनी ।
श्रीगुरु राहती जया स्थानीं । कामधेनु असे जाणा ॥ ९ ॥

श्रीपादश्रीवल्लभस्थानमहिमा । वर्णावया मी किमात्मा ।
अपार असे सांगतां तुम्हां । एखादा सांगेन दृष्टांत ॥ १० ॥

तुज सांगावया । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण ।
सर्वथा न करी तो निर्वाण । पाहे वास भक्तांची ॥ ११ ॥

दृढ भक्ति असावी मनीं स्थिर । गंभीरपणे असावे धीर ।
तोचि उतरे पैलपार । इह सौख्य परलोक ॥ १२ ॥

याचि कारणें दृष्टांत तुज । सांगेन ऐक वर्तले सहज ।
काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया ‘वल्लभेश’ ॥ १३ ॥

सुशील द्विज आचारवंत । उदीममार्गे उदर भरीत ।
प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया श्रीपादक्षेत्रासी ॥ १४ ॥

असतां पुढे वर्तमानीं । वाणिज्या निघाला तो उदिमी ।
नवस केला अतिगहनीं । संतर्पावे ब्राह्माणांसी ॥ १५ ॥

उदीम आलिया फळासी । यात्रेसि येईन विशेषीं ।
सहस्र वर्ण-ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन म्हणे ॥ १६ ॥

निश्र्चय करोनियां मानसीं । निघाला तो द्विज उदीमासी ।
चरण ध्यातसे मानसीं । सदा श्रीपादश्रीवल्लभाचे ॥ १७ ॥

जे जे ठायीं जातां देखा । अनंत संतोष पावे निका ।
शतगुणें जाहला लाभ अधिका । परमानंदे परतला ॥ १८ ॥

लय लावूनि श्रीपादचरणीं । यात्रेसि निघाला तत्क्षणीं ।
करावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले समागमे ॥ १९ ॥

द्रव्य घेऊनि द्विजवर । निघतां देखती तस्कर ।
कपटरुप होऊनि संगतीकर । तेही तस्कर निघाले ॥ २० ॥

दोनतीन दिवसवरी । तस्कर आले संगिकारी ।
एके दिवशी मार्गी रात्री । जात होते मार्गस्थ ॥ २१ ॥

तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जातो कुरवपुरासी ।
श्रीपादश्रीवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ॥ २२ ॥

बोलत मार्गेसीं । तस्करीं मारिलें द्विजासी ।
शिर छेदूनि परियेसी । द्रव्य घेतले सकळिक ॥ २३ ॥

भक्तजनांचा कैवारी । श्रीपादराव कुरवपुरीं ।
पावला त्वरित वेषधारी । जटामंडित भस्मांगी ॥ २४ ॥

त्रिशूळ खड्ग येरे हातीं । उभा ठेला तस्करांपुढतीं ।
वधिता झाला तस्करां त्वरिती । त्रिशूळेंकरुनि तयेवेळीं ॥ २५ ॥

समस्त तस्करांसि मारितां । एक येऊनि वुनविता ।
कृपाळुवा जगन्नाथा । निरपराधि आपण असें ॥ २६ ॥

नेणे याते वधितील म्हणोन । आपण आलो संगी होऊन ।
तूं सर्वोत्तमा जाणसी खूण । विश्र्वांचे मनींची वासना ॥ २७ ॥

ऐकोनि तस्कराची विनंति । श्रीपाद त्यातें जवळी बोलाविती ।
हाती देऊनियां विभूति । प्रोक्षी म्हणती विप्रावरी ॥ २८ ॥

मान लावूनि तया वेळां । मंत्रोनि लाविती विभूति गळां ।
सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा एकचित्तें ॥ २९ ॥

इतुके वर्तता परियेसीं । उदय जाहला दिनकरासी ।
श्रीपाद जाहले अदृश्येसी । राहिला तस्कर विप्राजवळी ॥ ३० ॥

विप्र पुसे तस्करासी । म्हणे तूं कां माते धरिलेसी ।
कवणे वधिले या मनुष्यांसी । म्हणोनि पुसे तया वेळी ॥ ३१ ॥

तस्कर सांगे द्विजासी । जाहले अभिनव परियेसीं ।
आला होता एक तापसीं । वधिलें यांते त्रिशूळें ॥ ३२ ॥

मातें राखिले तुजनिमित्त । धरोनि बैसविले अतिप्रीत ।
विभूति मंत्रोनि तूंते लावीत । सजीव केला तुझा देह ॥ ३३ ॥

उभा होता आतां जवळी । अदृश्य जाहला तत्काळी ।
न कळे कवण मुनि बळी । तुझा प्राण राखिला ॥ ३४ ॥

होईल ईश्र्वर त्रिपुरारि । भस्मांगी होता जटाधारी ।
तूं भक्त होशील निर्धारी । म्हणोनि आला ठाकोनियां ॥ ३५ ॥

ऐकोनि तस्कराचे वचन । विश्र्वासला तो ब्राह्मण ।
तस्करापाशील द्रव्य घेऊन । गेला यात्रे कुरवपुरा ॥ ३६ ॥

नानापरी पूजा करी । ब्राह्मणभोजन सहस्र चारी ।
अनंतभक्ती प्रीतिकरीं । पूजा करी श्रीपादगुरुपादुकांची ॥ ३७ ॥

ऐसे अनेक भक्तजन । सेवा करिती श्रीपादस्थान ।
कुरवपुर प्रख्यात जाण । अपार महिमा परियेसा ॥ ३८ ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरीं तूं मानसीं ।
श्रीपाद आहेति कुरवपुरासी । अदृश्य होऊनियां ॥ ३९ ॥

पुढे अवतार असे होणे । म्हणोनि गुप्त, न दिसे कवणा ।
अनंतरुप नारायण । परिपूर्ण असे सर्वां ठायीं ॥ ४० ॥

श्रीपादश्रीवल्लभमूर्ति । लौकिकी ऐक्य परमार्थी ।
झाला अवतार पुढे ख्याती । श्रीनरसिंहसरस्वती ॥ ४१ ॥

म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट साधती ॥ ४२ ॥ ॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
कुरवपुरक्षेत्रमहिमावर्णनं नाम दशमोऽध्यायः

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥